अग्रण धुळगावमध्ये थंडगार पाणपोई; महिलांच्या पुढाकारातून सेवाभावाचा आदर्श

महिलांनी अग्रणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार घेत महाराष्ट्र भूषण सन्मानानिमित्त प्रेमापोटी उभारलेली ही पाणपोई
पंढरीच्या पांडुरंगाच्या सेवेप्रमाणे निस्वार्थ कार्याचे प्रतीक ठरत आहे.ही पाणपोई प्रवाशांच्या तहानेला दिलासा देत मनालाही शांती देईल अग्रण धुळगावकरांच्या सामाजिक कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!
– जिल्हाधिकारी अशोक काकडे
अग्रण धुळगाव (ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) – महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नावाने अग्रण धुळगाव येथे रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर थंडगार पाण्याच्या पाणपोईचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे कडक उन्हाळ्यात वाटसरूंना मोठा दिलासा मिळणार असून गावातील सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संवाद साधत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
“पंढरीच्या विठ्ठलाप्रमाणे निस्वार्थ सेवा करत राहा,” असा संदेश देत त्यांनी महिलांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर व मारुती मंदिराजवळ अशा दोन ठिकाणी उभारण्यात आलेल्या या पाणपोईतून शुद्ध व थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. जि.प. अधिकारी श्री. अनंत पोतदार व सीआरपी प्रतिभा पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील सर्व महिला बचत गटांच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती यावेळी उल्लेखनीय ठरली.
पाणपोई हा उपक्रम सातव्या वर्षात पदार्पण करत असून, आयोजक रमेश खंडागळे, भारत भोसले (मुंबई) व सुरेश सुतार यांनी या सातत्यपूर्ण सेवाकार्याची माहिती दिली. पारंपरिक पद्धतीने मातीच्या माठांमध्ये रात्रीपासून फिल्टर पाणी साठवून ठेवले जाते व सकाळपासून प्रवाशांना थंडगार पाणी दिले जाते.
“पाणी पाजणे हे पुण्याचे कार्य” या भावनेतून गेली सहा वर्षे हा उपक्रम अविरत सुरू आहे.
कार्यक्रमात “महिलांचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान” हा संदेश देत महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला. समाजात महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे व त्यांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अग्रणी पाणी फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले, ग्रामपंचायत सदस्य वंदना भोसले, वर्षाराणी भोसले, तेजश्री भोसले, मनीषा भोसले, बालिकाताई भोसले, सोनल सुतार, पल्लवी देसाई, आम्रपाली काटकर, अर्चना भोसले, मंदाताई जाधव, स्नेहल जाधव, सुप्रिया भोसले, ज्योती काटकर तसेच विशाल देशमुख, अण्णासाहेब भोसले, बाळासाहेब भोसले यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम केवळ तहान भागवणारा नसून, सामाजिक ऐक्य व सेवाभावाची जाणीव करून देणारा ठरत आहे.




