छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

नाशिक:“आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ डोक्यावर न घेता त्यांच्या विचारांना डोक्यात घेऊन आचरणात आणणे गरजेचे आहे. शिस्त, धैर्य, नियोजन आणि स्वराज्याची भावना आत्मसात केल्यास प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. शिवरायांचे खरे स्मरण हे त्यांच्या विचारांच्या आचरणातूनच होते,” असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. सचिन देवरे पाटील यांनी केले.
ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील रोटरी क्लब सभागृहात दिमाखात पार पडला. या प्रसंगी त्यांनी “शिवरायांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्या” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या विचारपीठावर निसर्गोपचार तज्ञ डॉ. रावसाहेब घोडेराव, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले,आयटकचे राज्य सचिव राजू देसले, संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, पत्रकार जिजा दवंडे, पत्रकार चंद्रमणी पटाईत, छावा क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पांगारकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश शिंदे, महिला विकास महामंडळाच्या माजी जिल्हा व्यवस्थापिका नीलिमा साठे, डॉ. चंचल साबळे, मराठा साय शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव रविंद्रकुमार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फ्रेम, गोल्ड मेडल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून येवला तालुक्यातील गवंडगाव येथील एका लहान बालकाला, ज्याला जन्मापासून दर महिन्याला रक्त बदलावे लागते, त्याच्या उपचारासाठी संस्थेच्या वतीने ₹११,०००/- रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव मिलिंद कळवणकर, अनिल कळंके, सुनील आठवले, गणेश वाडेकर, सनी सूर्यवंशी, सुशील गांगुर्डे, राजेंद्र देवळे, आनंद पवार,गोपाल कदम, सतीश साळवे, शोभाताई केदारे, दिनेश निकाळजे,मनोज मुंडे विवेक बनकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मिलिंद कळवणकर यांनी मानले.



