जिल्हाध्यक्षांकडून शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे आश्वासन; गणपूर परिसरात कौतुकाचा वर्षाव

”माझा मुलगा स्वतः संकटात पडू शकला असता, पण त्याने मित्रांचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले, याचा मला सार्थ अभिमान आहे.”
— रवींद्र साहेबराव पाटील
(उमेशचे वडील
जळगाव/अमळनेर: पोहायला गेलेल्या चार मुलांचा काळ बनून आलेल्या अनेर नदीच्या खोल डोहात, अवघ्या १४ वर्षांच्या उमेश पाटीलने देवदूतासारखी धाव घेतली. आपल्या जिवाची पर्वा न करता उमेशने एकामागून एक अशा चार मुलांचे प्राण वाचवत मानवतेचे आणि असीम धैर्याचे दर्शन घडवले. या अतुलनीय शौर्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय उमेशभाऊ नेमाडे यांनी उमेशचा विशेष सत्कार केला असून, त्याच्या नावाची ’राज्य शौर्य पुरस्कारा’साठी शिफारस करण्याचे आश्वासन दिले आहे.
नेमकी घटना काय? गणपूर येथील रहिवासी असलेला उमेश रवींद्र पाटील (वय १४) हा आपल्या मित्रांसोबत अनेर नदीच्या पात्रात गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने अचानक त्याचे चार मित्र खोल डोहामध्ये ओढले गेले आणि बुडू लागले. उपस्थित मुलांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, अशा आणीबाणीच्या प्रसंगी उमेशने डगमगून न जाता प्रसंगावधान राखले. त्याने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उड्या मारल्या आणि अथक परिश्रमाने त्या चारही मुलांना सुरक्षितरीत्या काठावर आणले.
मान्यवरांच्या उपस्थितीत उमेशचा गौरव
उमेशच्या या धाडसाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे यांनी उमेशचे कौतुक करताना सांगितले की, ”एवढ्या लहान वयात दाखवलेले हे धाडस केवळ गणपूरसाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. अशा शूर मुलाला शासनाचा शौर्य पुरस्कार मिळावा, यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन.”
उपस्थित मान्यवर या गौरव सोहळ्याप्रसंगी धानोऱ्याचे रविभाऊ चौधरी, किशोरभाऊ दुसाने उपसरपंच घोडगाव , दीपकभाऊ वानखेडे, ’सकाळ’चे पत्रकार बाळकृष्ण पाटील, हर्षल करंदीकर, विनोद पाटील, डॉ. किरण पाटील, प्रवीण पाटील, गणेश पाटील आणि उमेशचे वडील रवींद्र साहेबराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच उमेशच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




